मृत्यू आणि सत्य
कधी कधी मनात विचार येतो की मृत्यूपेक्षा भयानक काय असावं? की मृत्यूच महाभयानक आहे? अगदी सखोल विचार केल्यानंतर माझ्या मनाने निष्कर्ष काढला की मृत्यू म्हणजे तर मोक्ष!
तर मृत्यूपेक्षा भयानक काय आहे? अनपेक्षित आणि दुर्दैवी सत्य! एक असं सत्य जे आपले संपूर्ण आयुष्य बदलते. ते सत्य समजण्याआधी त्या सत्याशी निगडित अनेक घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात आणि ते सत्य समजल्यानंतर त्यापूर्वीच्या घडलेल्या घटना अचानक ओळखीच्या वाटू लागतात. या सगळ्या घटना आठवताना होणारी यातना आणि घुसमट हे त्या मृत्यूच्या काही क्षण आधी होणारी तळमळ यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जीवघेणी असेल. मृत्यूच्या आधीची यातना फक्त काही क्षण सोसावी लागते पण अनपेक्षित आणि महाभयंकर सत्य यामुळे निर्माण झालेली यातना आयुष्यभर सोसावी लागते. दोन्ही प्रकारच्या यातनांमधील फरक फक्त एवढाच की मृत्यूचा सामना प्रत्येकाला करावा लागतो आणि अनपेक्षित व दुर्दैवी सत्य हे फक्त काही नशीबवानांच्याच आयुष्यात असतं. शेवटी मृत्यू, मोक्ष आणि अनंतात विलीन होणे हेच तर जीवनाचे महाअंतिम सत्य आहे. मृत्यूच्या यातना शेवटी सर्वांनाच सहन करायच्या आहेत. जीवनात दुर्दैवी सत्याची यातना मनामध्ये सोसत आणि चेहऱ्यावर हसू वागवीत आयुष्य जगणे म्हणजेच एका रणांगणावर न थकता एका योध्याने युद्ध लढण्यासारखे आहे आणि हेच क्षण आपल्याला आपल्या जीवनाच्या रणांगणावर महारथी बनवतात.
Comments
Post a Comment