नाती आणि मनुष्य
कधी कधी वाटतं की या आयुष्यरूपी शरीरावर नात्यांची वस्त्रे कधीच परिधान करू नये पण माणसाला विवस्त्र आयुष्य ही जगता येत नाही म्हणून मग जे भेटेल ते परिधान करण्याशिवाय मनुष्याकडे पर्याय राहत नाही. बहुतांश वेळा असं पण होतं की जास्त भरजरी वस्त्रे पण आपण परिधान केली तरी पण त्याचा जरी काठ आपल्याला कुठे तरी टोचत राहतो.
'नाती जपली पाहिजेत' हे तत्त्व जरी खरं असलं तरी त्या तत्त्वामध्ये एवढी ताकत नाहीये की जुने रुसवे फुगवे विसरून माणूस नव्याने परत नातं जपायला येईल. ज्यांना थोडं का होईना पण आयुष्य कळालं आहे ते च फक्त हे तत्त्व आणि त्या मागचा अर्थ समजू शकतात. आणि नाती जपताना पण नेहमी शरणागती यांनाच पत्करावी लागते, हे ही तितकंच सत्य आहे. जर नातं हे दोन व्यक्तिमधील असेल तर मग ते सांभाळण्याचं ओझं एकानेच का आपल्या खांद्यावरती सहन करायचं ? पण सहसा होतं असंच की फक्त एकच व्यक्ति ते नातं टिकून राहण्यासाठी धडपड करत असतो अगदी स्वतःच्या रक्ताने आपल्या नात्याची बाग फुलवल्या सारखी, पराकोटीचे हाल सोसून! आणि दुसरा व्यक्ति मात्र अगदी उन्मादपणे त्या बागेत धुडगूस माजवतो, ती बाग उध्वस्त करतो. जो पर्यंत सहनशीलता असते तो पर्यंत ते नातं तग धरून राहतं नाही तर त्या नात्याच्या वस्त्रांची लक्तरे होऊन दूर कुठे तरी जाऊन पडतील की त्याचा थांगपत्ता सुध्दा कोणाला लागणार नाही. जेव्हा त्या व्यक्ति ला जाणीव होईल तोपर्यंत ती लक्तरे शोधून त्याला शिवत बसण्याइतका वेळ पण निघून गेलेला असेल. शेवटी राहिल ती म्हणजे फक्त दृष्टीला दिसणारी ती उद्धवस्त बाग!
म्हणून च योग्य नात्यांची पारख आपल्याला असायला हवी आणि ती नाती आपण जपली पाहिजेत. नात्यांमध्ये स्वार्थ मुळीच नसला पाहिजे. जेव्हा आपण देवापुढे मस्तक टेकायला जातो म्हणजे फक्त ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करायला जातो तेव्हा जितकं पवित्र आपलं मन असतं तितक्याच पवित्रतेने माणसाने माणसाला जपलं पाहिजे. हे जग फक्त प्रेमावरती अवलंबून आहे. प्रेमाच्या ऋणानेच आपण बांधले गेलो आहे म्हणूनच आपल्याला आपल्या माणसांविषयी इतकी आत्मियता असते. शेवटी माणसाला गरज असते ती म्हणजे फक्त माणसाचीच !
जर प्रत्येकाने आपल्या नात्यांची बाग करुणेने फुलवली तर त्या बागेतील फुलांचा मनमोहक सुगंध आयुष्यभर दरवळत राहील आणि नात्यांची वस्त्र आपल्या आयुष्यरूपी शरीराचं सौंदर्य आणि शोभा नेहमी वाढवत राहतील.
-हाजरा
Comments
Post a Comment