आठवणी आणि अनुत्तरीत प्रश्न
ती कोजागिरी पौर्णिमेची रात्र आणि त्या मनमोहक चंद्राला साथ देणाऱ्या असंख्य चांदण्या, तो मंद मंद हळूवारपणे अंगाला झोंबणारा वारा, त्या वाऱ्याच्या लहरी सोबत येणारा आणि मनाला प्रसन्न करणारा रातराणीचा सुगंध, आपल्या आवाजाने रात्रीच्या शांततेला चिरणारे रातकिडे, चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघालेला प्रत्येक अमृत रूपी दुधाचा थेंब, मनाच्या एका कोपऱ्यात ठेवलेली ती आठवणींची पेटी, आणि मनाला भेडसावणारे असंख्य अनुत्तरीत प्रश्न ....
या सगळ्या प्रसन्न वातावरणात मी पहिल्या क्षणाला आठवणीमध्ये रमत होते तर दुसऱ्या क्षणाला माझ्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधत होते. आठवणी आणि प्रश्न-उत्तरे याची सुंदर अशी जुगलबंदी चालू असताना मला वाटले की ही रात्र कधीच सरु नये पण, पण जेव्हा मी भानावर आले. अगदी दुसऱ्या क्षणीच, तेव्हा पहाट झाली होती.... रात्र कधीच सरली होती....
आणि माझे अनुत्तरीत प्रश्न अगदी तसेच राहिले अनुत्तरीतच..! अगदी थोडा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की, जोपर्यंत आपल्याकडे आठवणी आणि काही अनुत्तरीत प्रश्न आहेत तोपर्यंतच आपल्या जगण्याला अर्थ आहे आणि हेच आपल्या जगण्याला आणि मनाला प्रोत्साहन देत असतात.
- हाजरा
Comments
Post a Comment